A A A A A
Bible Book List

अनुवाद 22 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

इतर नियम

22 “आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरु मोकाट सुटलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोंचते करा. तो मालक जवळपास राहात नसला किंवा कोण ते माहीत नसला तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्याला परत करा. कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा. व त्या शेजाऱ्याला मदत करा.

“कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्याला उठवून उभे राहायला मदत करा.

“बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकोचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने ते निंद्य आहे.

“वाटेत तुम्हाला झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका. हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायु व्हाल.

“नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा [a] अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हाला लागणार नाही.

यांची सांगड घालू नये

“द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरु नये. पेरलेत तर सारेच वाया जाईल. धान्य आणि द्राक्षं यापैकी काहीच तुम्हाला वापरता येणार नाही.

10 “बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका.

11 “लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरु नका.

12 “वेगवेगळे धागे एकत्र करुन त्यांचे गोंडे [b] आपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा.

विवाहविषयक नियम

13 “एखाद्या माणसाला लग्न केल्यावर बायकोशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर बायको आवडेनाशी झाली आणि 14 ‘मी या बाईशी लग्न केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले’ असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल. 15 अशा वेळी त्या मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे. 16 ‘मी या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आतां ती त्याला नकोशी झाली आहे. 17 त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा,’ असे मुलीच्या वडलांनी तेथे सांगून, त्या मंडळींना ती चादर दाखवावी. 18 यावर गावाच्या पंचांनी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी. 19 त्याला चाळीस औंस चांदी [c] दंड करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने बायको म्हणून तिचा स्वीकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये.

20 “पण बायकोबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर 21 गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही लाजिरवाणी गोष्ट केली आहे. आपल्या वडलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे.

स्वैर वर्तन

22 “एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलमधून या दुराचाराचे निमूर्लन करावे.

23 “एखाद्या कुमारिकेचा वाङनिश्चय झालेला असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर 24 त्या दोघांना गावाच्या वेशीपाशी भर चौकात आणून दगडांनी मरेपर्यंत मारावे ती दुसऱ्याची बायको होणार होती. तिच्याशी शरीरसंबधं ठेवल्याबद्दल पुरुषाला आणि गावांत असून मदतीसाठी आरडाओरडा केला नाही म्हणून त्या मुलीला मरेपर्यंत दगडांनी मारावे. अशाप्रकारे आपल्या लोकांमधून हा दुराचार निपटून टाकवा.

25 “पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे. 26 त्या मुलीला काही करु नये. देहान्तशासन व्हावे असे तिने काही एक केले नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले. 27 त्याला ही मुलगी रानात आढळली. त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये.

28 “जिचा वाङनिश्चय झालेला नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास 29 त्याने मुलीच्या वडीलांना वीस औंस चांदी [d] द्यावी. आता ती त्याची बायको झाली. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे पाप केले आहे. तो आता तिचा जन्मभर त्याग करु शकत नाही.

30 “आपल्या वडलांच्या बायकोशी गमन करुन कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”

Footnotes:

  1. अनुवाद 22:8 छताला कठडा प्राचिन इस्राएलमध्ये धाब्याची घरे होती त्यामुळे धाब्याचा उपयोग अतिरिक्त खोलीसारखा करण्यात येत असे. ह्या नियमामुळे छप्पर ही एक सुरक्षित जागा झाली होती.
  2. अनुवाद 22:12 गोंडे हे गोंडे निरनिराळ्या कापडांचे बनविलेले असून ते पवित्र मानलेले असत. त्यांचा उपयोग देव व त्याच्या आज्ञा ह्यांची आठवण राहाण्यासाठी केला जात असे.
  3. अनुवाद 22:19 चाळीस औंस चांदी लग्नाचा करार पक्का करण्यासाठी मुलगा नवरीच्या पित्याला नेहमी देतो त्यापेक्षा ही जवळ जवळ दुप्पट रक्कम आहे.
  4. अनुवाद 22:29 वीस औंस चांदी सदर रक्कम हुंड्याच्या स्वरुपात मुलगा नवरीच्या पित्याला लग्नाचा करार पक्का करण्यासाठी देत असे. नवरीचा पिता सदर रक्कम मुलीच्या पतीला जर काही झालेच तर तिची काळजी घेण्यासाठी जपून ठेवत असे.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes