A A A A A
Bible Book List

अनुवाद 19 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

आश्रय घेण्याची शहरे

19 “इतर राष्ट्रांच्या मालकीचा प्रदेश तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देत आहे. परमेश्वर त्या राष्ट्रांना नष्ट करेल. मग त्यांच्या जागी तुम्ही वस्ती कराल. त्यांची नगरे आणि घरे तुम्ही ताब्यात घ्याल. तेव्हा 2-3 त्या प्रदेशाचे तुम्ही तीन भाग करा. मग प्रत्येक भागात सर्वांना जवळ पडेल असे एक नगर निवडा. त्या नगरांना रस्त्यांची सोय करा. म्हणजे कोणाच्या हातून मनुष्यवध झाल्यास त्याला आश्रयासाठी या नगराकडे धाव घेता येईल.

“मनुष्यवध करुन या तीनपैकी एका नगरात आश्रयाला येणाऱ्याबद्दल नियम असा: पूर्वीचे वैर नसताना ज्याच्या हातून चुकून आपल्या शेजाऱ्याचा वध झाला आहे त्याने येथे जावे. उदाहरणार्थ, दोन माणसे लाकडे तोडायला जंगलात गेली. तेथे झाडावर कुऱ्हाड चालवत असताना चूकून कुऱ्हाडीचे पाते दांड्यापासून निसटले आणि ते नेमके दुसऱ्यावर पडून तो मेला. अशावेळी कुऱ्हाड चालवणाऱ्याने या तीनपैकी एखाद्या नगराच्या आश्रयाला जाऊन आपले प्राण वाचवावे. हे नगर फार दूर असेल तर त्याला तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक [a] त्याचा पाठलाग करील व त्याला त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. यास्तव मुळात त्या माणसाच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता. म्हणून ही नगरे सर्वांना जवळ पडायला हवीत. तेव्हा अशी तीन नगरे राखून ठेवा.

“तुमच्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाडवडिलांना वचन दिले होते. त्यांच्याजवळ कबूल केलेला सर्वप्रदेश तो तुम्हांला देईल. तुमचाच देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा व त्याने दाखवलेल्या जीवनमार्गाने जा. या मी दिलेल्या आज्ञा तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर तुम्हाला हे सर्व मिळेल. मग परमेश्वराने तुमच्या प्रदेशाचा विस्तार केला की तुम्ही पहिल्या तीन नगरांच्या भरीला आश्रयासाठी आणखी तीन नगरे निवडा. 10 म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या भूमीवर निर्दोष माणसांची हत्या होणार नाही आणि अशा हत्येचे पाप तुम्हांला लागणार नाही.

11 “पण द्वेषापोटीही एखादा माणूस संधीची वाट पाहात लपून छपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करुन या नगरात आश्रयाला येईल. 12 अशावेळी त्याच्या नगरातील वडिलधाऱ्यांनी माणसे पाठवून त्याला तेथून बाहेर काढावे व मृताच्या आप्तांच्यां हवाली करावे. त्याला मृत्यूची सजा झाली पाहिजे. 13 त्याच्याबद्दल कळवळा वाटू देऊ नका. कारण त्याने निरपराध माणासाचा खून केला आहे. इस्राएलमधून हा कलंक दूर करा. मग सर्व काही ठीक होईल.

जमिनीची हद्द

14 “शेजाऱ्याच्या जमिनीची हद्द दाखवणारे दगड दूर करु नका. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे दगड म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढी जमीन दिली त्याच्या खुणा होत.

साक्षीदार

15 “नियमाविरुद्ध वागल्याचा, अपराधाचा आरोप कुणावर असेल तर त्याला दोषी ठरवायला एक साक्षीदार पुरेसा नाही. त्याने खरेच गुन्हा केला आहे हे ठरवायला दोन किंवा तीन साक्षीदार तरी हवेतच.

16 “अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो. 17 अशावेळी त्या दोघांनी परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी जावे आणि तेथे जे याजक व न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांनी निवाडा करावा. 18 न्यायाधीशांनी कौशल्याने चौकशी केली पाहिजे. त्यातून साक्षीदाराचा खोटारडेपणा उघडकीला आला तर 19 मग तुम्ही त्याला शिक्षा करा. तथाकथित अपराध्याला जे शासन व्हावे असे त्याला वाटत होते तेच याला करा. अशा रीतीने आपल्यामधून नीच वृत्तीचा नायनाट करा. 20 इतरांच्या कानावर हे गेले की त्यांनाही दहशत बसेल आणि असे प्रकार करायला ते धजावणार नाहीत.

21 “गुन्हा जितका गंभीर स्वरुपाचा तितकीच शिक्षाही कडक असावी. अपराध्याला शासन करताना दया दाखवण्याचे कारण नाही. कोणी कोणाचा जीव घेतल्यास त्यालाही देहांताचे शासन द्यावे. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताच्या बदल्यात हात आणि पायाच्या बदल्यात पाय असा दंड करावा.

Footnotes:

  1. अनुवाद 19:6 जवळचा नातेवाईक शब्दश: “रक्ताचा सूड घेणारा” जेव्हा एखादी व्यक्ति मारली जाते तेव्हा तिच्या जवळच्या नातेवाईकांनी खूनी व्यक्तिला शासन झाले किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes