A A A A A
Bible Book List

अनुवाद 1 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

इस्राएल लोकांसमोर मोशेचे प्रवचन

मोशेने इस्राएल लोकांना हा संदेश दिला. तेव्हा ते सर्व यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानात सूफाच्या समोर एकीकडे पारान आणि दुसरीकडे तोफेल, लाबान, हसेरोथ व दी-जाहाब या नगरांच्या मध्ये होते.

होरेबा (सिनाई) पासून कादेश-बर्ण्यापर्यंतची वाट सेईर डोंगरांच्या मागे फक्त अकरा दिवसांची आहे. पण इस्राएलांनी मिसर सोडले आणि ते या जागी आले याला चाळीस वर्षे लागली. तेव्हा चाळीसाव्या वर्षाच्या अकराव्या महिन्यातील पहिल्या दिवशी मोशे इस्राएल लोकांशी हे बोलला. परमेश्वराने जे जे काही सांगायची आज्ञा केली होती; ते सर्व त्याने सांगितले. अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांना परमेश्वराने ठार मारल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहात असे. ओग बाशानचा राजा होता. तो अष्टेरोथ व एद्रई येथे राहाणारा होता.) परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशे आता यार्देनच्या पूर्वेला मवाबच्या देशात नियमशास्त्राचे विवरण करु लागला.

“मोशे म्हणाला, आपला देव परमेश्वर होरेबात (सिनाई) आपल्याशी बोलला. त्याने सांगितले, ‘या डोंगरातील तुमचे वास्तव्य आता पुरे झाले. आता तुम्ही इथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा. आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा. यार्देनेच्या खोऱ्यात, अराबांच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेवमध्ये समुद्रकिनारी जा. कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा. पाहा हा प्रदेश मी तुम्हाला देऊ करत आहे. जा आणि त्यावर ताबा मिळवा. अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे मी वचन दिले होते.’”

अधिकाऱ्यांची नेमणूक

मोशे पुढे म्हणाला, “‘तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की मी एकटा तुमचा सांभाळ करु शकणार नाही. 10 आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे. परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे. 11 तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने ती आणखी वाढून आत्ताच्या हजारपट होवो आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळो. 12 पण मी एकटा तुमचा सांभाळ करायला तसेच तुमची आपापसांतली भांडणे सोडवायला असमर्थ आहे. 13 म्हणून मी तुम्हाला सांगितले, आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना प्रमुख म्हणून नेमतो.’

14 “त्यावर ‘हे चांगलेच झाले’ असे तुम्ही म्हणालात.

15 “म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. हजारांच्या समूहावर एक अधिकारी, शंभरांवर एक, पन्नासांवर, दहावर तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.

16 “या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करु नका. मग तो वाद दोन इस्राएलींमधला असो की एक इस्राएली व एक उपरा यांच्यातील असो. नीतीने न्याय करा. 17 कोणालाही कमी अधिक लेखू नका. सर्वांना समान लेखा. कोणाचीही भीती बाळगू नका. कारण तुम्ही दिलेला न्याय हा देवाचा आहे. एखादे प्रकरण तुम्हाला विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन. 18 तुमच्या इतर कर्तव्यांबद्दलही मी तेव्हाच तुम्हांला सांगितले होते.

कनानात पाठवलेले हेर

19 “मग आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार आपण होरेबहून पुढे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे निघालो. तेव्हा वाटेत आपल्याला ते विस्तीर्ण आणि भयंकर वाळवंट लागले. ते ओलांडून आपण कादेश-बर्ण्याला पोचलो. 20 तिथे मी तुम्हाला म्हणालो की पाहा, अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशात तुम्ही पोचलात. आपला देव परमेश्वर तुम्हाला हा प्रदेश देणार आहे. 21 हा प्रदेश तुमचाच आहे. तुमच्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार तो हस्तगत करा. कचरु नका व कशाचीही भीती बाळगू नका.

22 “पण तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणालात की, आधी आपण काही जणांना त्या प्रदेशाच्या पाहाणीसाठी पुढे पाठवू. म्हणजे ते त्या देशाची माहिती मिळवून आपल्याला कोणत्या मार्गाने जावे लागेल, कोणकोणती नगरे तेथे लागतील याची खबर आणतील.

23 “मलाही ते पटले. म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी बारा माणसे मी निवडली. 24 ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अष्कोल ओढ्यापर्यंत पोचले. त्यांनी तो देश हेरला. 25 येताना त्यांनी तिकडे होणारी काही फळे बरोबर आणली. त्या प्रदेशाची माहिती सांगितली व ते म्हणाले की, आपला देव परमेश्वर देत असलेला हा भूभाग उत्तम आहे.

26 “पण तुम्ही तेथे जायचे नाकारलेत. आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरुद्ध बंड केलेत. 27 तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात की परमेश्वर आमचा द्वेष करतो. अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हाला त्याने मिसर देशातून बाहेर काढले. 28 आता आम्ही कुठे जाणार? आमच्या या भावांच्या (12 हेरांच्या) बातम्यांमुळे घाबरुन आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांच्या खबरीनुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाक वंशी महाकाय आहेत.

29 “तेव्हा मी तुम्हाला म्हणालो की हताश होऊ नका. त्या लोकांना घाबरु नका. 30 स्वतः परमेश्वर देव तुमचा पाठिराखा आहे. मिसर देशात तुमच्यादेखत त्याने जे केले तेच तो येथेही करील. तुमच्यासाठी लढेल. 31 तिकडे तसेच या रानातल्या वाटचालीतही, माणूस आपल्या मुलाला जपून नेतो तसे त्याने तुम्हांला येथपर्यंत सांभाळून आणले.

32 “तरीही तुम्ही आपल्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला नाही. 33 प्रवासात तो तुमच्यासाठी मुक्कामाचे ठिकाण शोधायला तसेच रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन तुम्हाला मार्गदर्शन करायला तुमच्यापुढे चालत असे.

लोकांना कनानात प्रवेश बंदी

34 “परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले व तो संतापला. कठोरपणे शपथपूर्वक तो म्हणाला, 35 ‘तुमच्या पूर्वजांना कबूल केलेला हा उत्तम प्रदेश या कृतघ्न पिढीतील एकाच्याही दृष्टीस पडणार नाही. 36 यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहील. त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्याला व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईन. कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे.’

37 “तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावरही कोप झाला. तो म्हणाला, ‘मोशे, तूही या प्रदेशात प्रवेश करणार नाहीस. 38 पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल. त्याला तू प्रोत्साहन दे कारण इस्राएलांना तोच देश वतन म्हणून मिळवून देईल.’ 39 परमेश्वर पुढे आपल्याला म्हणाला, ‘शिवाय आपले शत्रू आपल्या मुलाबाळांना पळवतील असे तुम्ही म्हणालात. ती मात्र या देशात जातील. मी मुलांवर तुमच्या चुकांचे खापर फोडत नाही. कारण बरे वाईट ठरविण्याइतकी ती मोठी नाहीत. 40 पण तुम्ही-तुम्ही मात्र परत फिरुन तांबड्या समुद्राच्या वाटेने रानाकडे कूच करा.’

41 मग तुम्ही मला म्हणालात की आमच्या हातून पाप घडले आहे. आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू. मग तुम्ही शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज झालात.

तो डोंगराळ भाग सर करणे सहज जमेल असे तुम्हांला वाटले. 42 पण परमेश्वर मला म्हणाला, ‘त्यांना तेथे जाऊन युद्ध करण्यापासून परावृत कर. कारण मी त्यांच्या बाजूचा नाही. शत्रू त्यांना पराभूत करेल.’

43 “त्याप्रमाणे मी त्यांना सांगितले. पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीत. आणि धिटाई करुन त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेलात. 44 तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले. आणि चवताळलेल्या मधमाश्यांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हाला पिटाळून लावले. 45 मग तुम्ही परत येऊन परमेश्वराकडे मदतीसाठी याचना केलीत. पण त्याने तुमचे काहीही ऐकले नाही. 46 तेव्हा तुम्ही कादेश येथे बरेच दिवस राहिलात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes