Add parallel Print Page Options

योशीयाचे यहूदावर राज्य

22 योशीया राज्य करु लागला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यदीदा. ती बसकथमधील अदाया याची मुलगी. योशोयाचे वर्तन परमेश्वराला पटेल असेच होते. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे तो चालला. परमेश्वराच्या शिकवणुकी प्रमाणेच वागला. देवाला जसे पाहिजे तेच त्याने केले.

मंदिराच्या दुरुस्तीचा आदेश

मशुल्लामचा मुलगा असल्या याचा मुलगा शाफान चिटणीस याला योशीया राजाने आपल्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराच्या मंदिरात पाठवले आणि सांगितले. मंदिराच्या दुरुस्तीचा आदेश, “तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे. परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखेरख करणाऱ्यांना याजकांनी यातील पैसे द्यावेत. मंदिराची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना देण्यासाठी या पैशाचा विनियोग व्हावा. सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत. दिलेल्या पैशाचा हिशेब मागू नये कारण ही मंडळी विश्वसनीय आहे.”

मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक

महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, “मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे.” मग ते पुस्तक याजक हिल्कीयाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले.

शाफानने परत येऊन राजाला सर्व वर्तमान सांगितले. तो म्हणाला, “तुझ्या सेवकांनी मंदिरातील सर्व पैसा एकत्र करुन तो परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्यांना त्यांनी दिला आहे.” 10 पुढे शाफान राजाला म्हणाला, “याजक हिल्कीया याने हे पुस्तकही मला दिले.” शाफानने ते राजाला वाचून दाखवले.

11 नियमशास्त्रातील वचने ऐकून राजाने अतीव दु:ख प्रदर्शित करण्यासाठी आपली वस्त्रे फाडली. 12 मग त्याने याजक हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम, मिखायाचा मुलगा अखबोर, शाफान चिटणीस आणि सेवक असाया यांना आज्ञा केली की, 13 “आता जाऊन परमेश्वराचा कौल घ्या. मी, आपले लोक आणि सर्व यहूदा यांच्या वतीने त्याला या पुस्तकातील वचनांविषयी विचारा. परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. कारण आपल्या पूर्वंजांनी या पुस्तकातील वचनांचा भंग केला आहे. आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या नाहीत.”

योशीया आणि संदेष्ट्री हुल्दा

14 मग हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती बायको. शल्लूम याजकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी, हुल्दा यरुशलेममध्ये दुसऱ्या भागात राहात होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले.

15 तेव्हा हुल्दा त्यांना म्हणाली, “इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो: तुम्हाला माझ्याकडे ज्याने पाठवले त्याला सांगा: 16 ‘परमेश्वराचे म्हणणे आहे की, हा प्रदेश आणि तेथे राहणारे लोक यांच्यावर आता मी अरिष्ट आणणार आहे. यहूदाच्या राजाने त्या पुस्तकात वाचली तीच संकटे येतील. 17 यहूदाच्या लोकांनी माझा त्याग केला. इतर दैवतांपुढे त्यांनी धूप जाळला. त्यांनी मला संताप आणला. त्यांनी अनेक मूर्तींही केल्या. म्हणून या प्रदेशावर माझा राग आहे. न विझवता येणाऱ्या अग्निसारखा माझा संताप असेल.’

18-19 “यहूदाचा राजा योशीया याने तुम्हाला परमेश्वराचा कौल घ्यायला पाठवले. योशीयाला हे सांगा: ‘इस्राएलाचा देव परमेश्वराची वचने तू ऐकलीस. हा प्रदेश आणि येथील लोक यांच्याविषयी मी सांगितले ते ऐकलेस. तू मृदू मनाचा आहेस. या गोष्टी ऐकून तुला दु:ख झाले. यरुशलेमवर अरिष्ट येईल असे मी म्हणालो तेव्हा शोकाने तू वस्त्रे फाडलीस आणि रडलास. म्हणून मीही तुझे ऐकले आहे.’ हे परमेश्वराचे शब्द आहेत. 20 ‘मी तुझी तुझ्या पूर्वजांशी भेट करुन देईन. तुला मरण येईल आणि तू सुखाने कबरीत पडशील. यरुशलेमवर येणारे अरिष्ट तुला आपल्या डोळ्यांनी पाहावे लागणार नाही.’”

मग याजक हिल्कीया, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया यांनी हा संदेश राजाला सांगितला.